Tuesday 25 December 2007

सा-या ऋतूत जपला ...

सा-या ऋतूत जपला ह्रुदयातला वसंत...

शोधीत गाव आलो स्वप्नात पाहिलेले
किती रंग जीवनाला व्यापून राहिलेले
कधी उन झेलले अन कधी तृप्त चांदण्यात
सा-या ऋतूत जपला ह्रुदयातला वसंत

दिस मावळेल आता उजळेल चांदरात
जाता सरून रजनी येते नवी पहाट
चाले अखंड पुढती ऋतूचक्र हे अनंत

सा-या ऋतूत जपला ह्रुदयातला वसंत



तू तिथं मी ... एक सुंदर चित्रपट फार काळानंतर पाहिला ... आणि हे गाणं मनात रेंगाळत राहिलं.


काय मस्त कल्पना आहे. आता जेव्हा इथे बाहेर बर्फाळ गारठा आहे त्यामुळे तर हे कुठेतरी वेगळंच स्पर्शून गेलं. कुठून सुचतात अशी रुपकं? विजय कुवळेकरांची गीतं आहेत... आशयपूर्ण गाणी ... रविंद्र साठे, रुपकुमार राठोड आणि जयश्री श्रीराम यांचा आवाज। सगळं कसं जुळून आलं आहे..


तू तिथं मी.. तशी कथा म्हाता-य़ा निवृत्तांसाठी आहे.. पण हा विचार तर सगळ्यांसाठी लागू पडतो. का कुणास ठाउक पण ती ओळ मनात सारखी गुणगुणतो आहे. कदाचित माझा नेहमीचा विचार की मी कसा वागतो. जी कल्पना मला आवडते ती मी किती प्रत्यक्षात आणतो? इथे तर दिवसा दिवसाला काय तासा तासाला मनातला ऋतू बदलतो! तेही ठीक आहे. मनुष्य स्वभावाला अनुसरुन आहे आणि माझ्यासारख्या मूडी माणसाचं तर असंच होणार.. आणि हो सगळं जर मस्त मजेत असेल तर मूड का बदलेल. काही ना काही तर घडत राहतंच जे मनाल बोचतं ...


पण तो वसंत जपण्याचा मी प्रयत्न करतो का ? ....... मला तर वाटत नाही... कायम शिशिराचीच चिंता अन विचार...


कदाचित म्हणूनच ही ओळ कुठेतरी विचार करायला भाग पाडते आहे.. काय ना... एका ओळीमध्ये काय काय आहे...


एक विचार मनात आला.. वसंत का.. आणि तो इतका का भावतो... इथे तर या देशात या शिशिराची काय छान रुपं पहायला मिळतात... मला पुण्याची लाडकी थंडी आठवली... नोव्हेंबर ते फेब्रुवारी जी काही मस्त हवा असते... ती सकाळी फुललेली पर्वती :) ... अशी गुलाबी थंडी... आणि बोचरी सुद्धा चांगलीच वाटते... आणि पाऊस ! असा असंख्य रुपात दिसत जाणवत राहतो... मग वसंतच का?


बहुधा मुळातच माणसाला सृजनाचा ध्यास आहे... वसंत बहरतो म्हणूनच असा ह्रुदयाशी जपला जातो. का वसंत म्हणल्यावर असं छान वाटतं ... काही तरी विशेष भावना आहे... ती त्याच उत्फुल्लतेची. तो आनंद जपून ठेवला तर खरंच मग रोजचे ग्रीष्म सुसह्य होतील...



आलो कुठून कोठे तुडवीत पायवाट


काटे सरुन गेले उरली फुले मनात


प्रत्येक पावलाचे होते नवे इशारे


सा-या ऋतूत जपला ह्र्दयातला वसंत.......







Sunday 16 December 2007

श्रीगणेशा

सुरुवात अवघड असते म्हणतात. श्रीगणेशा तर झाला.
खुप दिवस ब्लॉग सुरु करण्याचं मनात होतं. अखेर आज मुहुर्त लागला...
छान वाटतंय... मराठी लिहायला जरा अवघड जातंय ... होइल सवय हळू हळू ...
UK मधला एक निवांत रविवार सत्कारणी लागला...