Wednesday 25 February 2009

नॉस्टॅल्जिया आणि गुलजार

देशातून राणीच्या देशात आल्यापासून नॉस्टॅल्जिया आणि जुन्या आठवणी पाठ सोडत नाहीयेत.तसं मला सगळ्या जुन्या गोष्टींचं वेड आहेच... पण समजत नाही मनात इतके जुने संदर्भ कुठे दडून बसलेले असतात आणि असं कुठून काय उफाळून येतं!गुलजारची गाणी लावली आज खुप दिवसांनी... असं काय उदास लिहितो हा माणूस... असं मन ढवळून निघतं आणि मग तळाशी बसलेलं काही बरं वाइट वर येतं... जुन्या डायरीची पानं चाळल्यासारखं...थोडं शेवाळ, थोडी माती.. कुठे काचेचे काही रंगीत तुकडे... काही जपून ठेवलेल्या वस्तू ... ज्या ठेवल्या आहेत याचा विसर पडला आहे ... काही अनवधानाने राहिलेलं आणि काळाच्या ओघात खाली बसलेलं ... लक्षात येतं की सगळं काही विसरलं हरवलं नाहीये.. काही तरी विचित्र वाटतं.. मला माहीत नाही मीच असा हळवा होतो का गुलजारचे शब्द आणि ती अभिजात गाणी शब्द आणि अर्थाच्या संदर्भापलिकडे काही अनाहत नाद जाणवतात...

दिल ढुंढता है फ़िर वही फ़ुरसत के रात दिन
बैठे रहे तसव्वुरे जाना किये हुए॥

सुरेल द्वंद्वगीतापेक्षा भूपिंदर च्या आवाजतलं स्लो गाणं तर विलक्षण अस्वस्थ करून सोडतं...तेवढयात पुढचं गाणं हळुच बोट धरून येतं
एक अकेला इस शहर में, रात में और दोपहर में
आबोदाना ढुंढता है आशियाना ढुंढता है
दिन खाली खाली बर्तन है और रात है जैसे अंधा कुआ....

असं काय असतं जे माणसाला खुणावत राहतं? आणि का? कशामुळे?... इतक्या सुंदर देशात सुबत्ता असताना कार्पेटच्या सुखद स्पर्शात अचानक वीस वर्ष जुना शहाबादी फरशीचा तो खडबडीत स्पर्श आठवतो जणू आत्ता पायाखाली आहे...आणि ज्याला विअर्ड म्हणावं असं काही ... तो जुना स्पर्श अधिक हवा हवासा वाटतो...

नाम गुम जायेगा चेहरा ये बदल जायेगा ...

एखादी कलती दुपार - थोडीशी संध्याकाळ छान उन्हं घेऊन येते... पश्चिमेच्या खिडकीतून घरात कवडसे डोकावतात... चक्कर मारायला आणि उन खायला बाहेर पडतो... एखाद्या सुबक सुंदर बैठ्या घराच्या आवारात गोड गोरी मुलं खेळत असतात... आणि अचानक तो एक विशिष्ट जुन्या लाकडाचा वास येतो... ओकचा असावा. आणि त्यामागोमाग दरवळतो इंग्लिश चहाचा परिचित वास... आणि अक्षरशः खेचल्यासारखं मन मागे जातं ...
एखाद्या मस्त रविवारी घरचं साधंच पण मस्त जेवण जेवून एक कादंबरी घेऊन पडायचो .... थोड्या वेळाने एक मस्त डुलकी काढायची... आणि मग थोड्या वेळाने सुस्तावलेल्या घराला जाग यायची... स्वैपाकघरात थोडी लगबग... आधण चढवलं आहे असा अंदाज करावा तोवर कप बशा मांडल्याचे आवाज ... अखेर हाक कानावर आली की पलंगावरून उठण्याचा नाइलाज आणि ती चहाची तलफ़ अशा द्विधा विचारात तो दुधाळ आणि लालसर चहा समोर... कुठल्या तरी गप्पा... बागेत पाणी सोडल्याने येणारा तो एक ठराविक वास..एकदम जरा थंडी वाजते .... मी भानावर येतो... ही लंडनची हवा नेहमीप्रमाणे बदलत असते.... घाईघाईत घरी येतो...चहा टाकतो... परत गुलजार आठवणी जाग्या करतो...
छोड आये हम वो गलियां....

वाफाळता चहाचा कप घेऊन मी बाहेरच्या बदललेल्या ऋतू कडे आभाळाकडे पाहत राहतो...आशा मागे स्वराबरोबर मनाच्या तारा छेडत राहते...

ये लम्हा फ़िलहाल जी लेने दे....

गुलजार च्या शब्दां बरोबर नॉस्टॅल्जिया घर भरून राहतो...

1 comment:

Samved said...

काय म्हणता? तू लिहीतोस माहीत नव्हतं :(